पुणे : महापालिकेने यंदा मिळकत करामध्ये सवलत देण्याच्या योजनेचा कालावधी ३१ मेऐवजी ३० जूनपर्यंत वाढविला; मात्र त्याचा फारसा फायदा पालिकेला झाल्याचे दिसून येत नाही. पालिकेला ३ महिन्यांत मिळकत करातून ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सवलत मिळविण्यासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये लोकांकडून सर्वाधिक भरणा होईल असा विश्वास पालिकेच्या वतीने व्यक्त केला जात आहे.३० जूनपर्यंत कर भरल्यास त्यामध्ये ५ ते १० टक्क्यांची सूट दिली जाते. पूर्वी ही सवलत ३१ मेपर्यंत दिली जायची, यंदा त्यामध्ये ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली. मात्र सवलत योजनेला वाढ दिल्याचा फारसा फायदा नागरिकांनी घेतल्याचे दिसून आले नाही. यंदा ३० जूनपर्यंत मागील वर्षीपेक्षा मिळकतकराचा भरणा कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी ३० जूनपर्यंत ५६४ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले होते. नागरिकांना मिळकतकरामध्ये सवलत घेण्यासाठी आणखी ३ दिवस शिल्लक असून, या काळात मिळकत कराचा विक्रमी भरणा होईल, असा विश्वास मिळकतकर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत पावणेपाच लाख मिळकतधारकांनी कराचा भरणा केला आहे. त्यातील १ लाख ६० हजार जणांनी आॅनलाईन पद्धतीने मिळकतकर भरला आहे. आॅनलाईन मिळकतकर भरण्याची सुविधा मोबाईल अॅपद्वारेही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मिळकतकरामधून पालिकेला ५०० कोटी
By admin | Published: June 28, 2016 12:44 AM