मुंबई : राज्यातील अल्पसंख्य समाजाच्या विकासासाठी एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यात आधारभूत धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. अल्पसंख्यविकास विभागासाठी अंतरिम अर्थसंकल्पात २८० कोटी, अतिरिक्त अर्थसंकल्पात ८२ कोटी असे एकूण ३६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता आणखी १३८ कोटी रुपयांची तरतूद करूनही रक्कम ५०० कोटी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. विविध विभागांच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की धान खरेदीबाबत सभागृहात मागणी झाल्यानंतर आपण केंद्रीय मंत्री व सचिवांशी चर्चा केली आणि त्यानुसार धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्याकांसाठीचा निधी किमान एक हजार कोटी रुपये करावा, अशी मागणी काँग्रेसचे अमीन पटेल यांनी केली होती.
अल्पसंख्याकांसाठी ५०० कोटी
By admin | Published: June 12, 2014 4:31 AM