मुंबई : पाणीपट्टी, मलनिस्सारण कर वाढवून अन्य करवाढीचेही संकेत दिल्यानंतर रोषाचा सामना करणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीने सुमारे पाचशे कोटींचे छोटे-छोटे प्रकल्प जाहीर करुन मुंबईकरांना खुशीची गाजरे दाखविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे़ रेसकोर्सचे थीम पार्क, महामुंबई स्वास्थ्य शिवकवच, शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळ यासाठीही निधीची तरतूद केली आहे़ विशेष म्हणजे बेस्टला शंभर कोटींची मदत व नगरसेवकांचा विकासनिधी कायम ठेवण्यात आला आहे़सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षासाठी ३३ हजार ५१४़ १५ कोटींचा व दोन कोटी ७४ लाख शिलकीचा अर्थसंकल्प काही सुधारित तरतुदींसह स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला़ गलिच्छ वस्त्यांवर मालमत्ता कर, वाहतूक, साफसफाई आणि अग्निशमन उपकर भविष्यात वाढण्याचे संकेत या अर्थसंकल्पातून देऊन युतीने मुंबईकरांचा रोष ओढावून घेतला होता़मात्र अर्थसंकल्पात काही सुधारणा करुन नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत़ तर काही जुन्या योजनांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे़ यामध्ये माथाडी भवन, डबेवाले भवन, आगरी भवन, पूर्व व पश्चिम रुग्णालयांमध्ये मॉलिक्युलर लॅब, चौकांचे सुशोभीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कला व सांस्कृतिक भवन, पुरातन, ऐतिहासिक, धार्मिक स्थळांचे सुशोभिकरण यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)
पाचशे कोटींच्या प्रकल्प योजना
By admin | Published: February 27, 2015 2:52 AM