मुंबई : राज्यातील ज्या गावे/शहरांमध्ये मोठे सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षमपणे चालविली जात आहेत अशा ठिकाणी पूर्वापार चालत आलेले ५०० लहान सरकारी दवाखाने/ आरोग्य युनिट बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तथापि, या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही.सूत्रांनी सांगितले की आरोग्य सेव गावागावात पोहोचावी या दृष्टीने बऱ्याच वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य युनिट, दवाखाने उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी एक डॉक्टर, दोन नर्स, एक शिपाई असा कर्मचारी वर्ग दिलेला होता. मात्र, कालांतराने त्या ठिकाणी मोठी शासकीय रुग्णालये (पीएचसी) आदी उभी राहिली. त्यामुळे एकाच गावात दोन सरकारी दवाखाने झाले. पूर्वीपासून असलेल्या अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांसह पुरेसा कर्मचारी वर्गदेखील नाही. शासकीय आरोग्यसेवेची दुरुक्ती मात्र अनेक ठिकाणी होत आहे. या लहान दवाखान्यांकडे दवाखान्यांनीदेखील पाठ फिरविली. त्यात अॅलोपॅथी व आयुर्वेदिक दवाखान्यांचाही समावेश आहे.या पार्श्वभूमीवर, जेथे अशी दुरुक्ती झालेली आहे तेथील पूर्वीचे लहान दवाखाने बंद करून तेथील कर्मचारी वर्ग स्थानिक रुग्णालयात वा जवळपास वर्ग करण्याबाबत माहिती मागविण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. राज्यात असे जवळपास ८५० दवाखाने आहेत आणि दुरुक्तीमुळे त्यातील ५०० दवाखाने बंद केले जाऊ शकतात. मात्र, एकाच गावात दोन ठिकाणी उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवेपैकी एकावर त्यामुळे गदा येणार आहे.
५०० सरकारी दवाखाने होणार बंद; आरोग्य विभागाने मागविली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:51 AM