वाशिम :
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३७ वा नेत्रदान पंधरवडा साजरा होत असून, जिल्हा सामान्य रुग्णालय व मंत्रीपार्क गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी ५०० जणांचे नेत्रदान संकल्प पत्र भरून घेण्यात आले.
यंदाच्या नेत्रदान पंधरवड्याला २५ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून, ८ सप्टेंबरपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. या पंधरवड्यानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय व मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळाच्या वतीने नेत्रदान प्रबोधन व नोंदणी शिबिर पार पडले. यावेळी ५०० नेत्रदान संकल्प पत्र भरून घेण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. सुरेश चांडोळकर, डॉ. आशिष बेदरकर, डॉ. अविनाश पुरी यांच्यासह मंत्रीपार्क गणेश उत्सव मंडळाचे मनीष मंत्री, नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे, सुधीर साळवे, नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, लेखापाल ओम राऊत, गणेश व्यवहारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.