ऑनलाइन लोकमत/नंदकिशोर नारे
वाशिम, दि. 20 - ‘भेगाळ माय मातीच्या या डोळयात जागलीसे आस, घेवून हातामधी हात लेकरांनी घेतला ध्यास’ या ओवी सार्थ ठरवित स्थानिक सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी गृपच्यावतीने शहरांमध्ये निर्जळ व जास्त झाडे असलेल्या ठिकाणी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करुन जवळपास ५०० पाणवठे (वॉटर फिडर्स फॉर बर्डस) शहरातील व उपनगरातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने बसवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. 20 मार्च या जागतिक चिमणी दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी जय्यत तयारी प्रतिष्ठानच्यावतीने सुरु करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे प्रदूषण आणि जागतिक उष्मांकाचा आकडा वाढत असल्यामुळे अनेक पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. उन्हाळयात असंख्य पक्षी पाण्याच्या ठिकाणी स्थलांतरीत होतात तर काहींना पाण्याअभावी तहानेने व्याकुळ होवून मरण पत्करावे लागते. मानव हा प्राणी अंत्यत बुद्धीमान त्याने आपल्या बुद्धी प्राबल्याच्या बळावर अनेक शोध लावले आणि यशाची शिखरे सर केलीत. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या उक्तीप्रमाणे मानव निसर्गाला काही देण्याऐवजी सर्वकाही घेतच गेला. मानवाच्या या अधाशी प्रवृत्तीमुळे अनेक पक्षी आणि प्राणी मात्रांचे जीवन धोक्यात आले आहे. म्हणून निसर्गाशी व प्राणीमात्रांविषयी जवळीक साधून निर्सग व्यासंगी मंडळींनी पुढे येवून या संकटाचा वेळीच सामना करणे अत्यंत करणे गरजेचे आहे. भविष्यात चिमणी हा प्राणी कसा असतो हे सांगण्याची वेळ येवू नये म्हणून सावली प्रतिष्ठानच्यावतीने आगामी काळात विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात आहे.
दरम्यान पक्ष्यासाठी पाणपोई हा उपक्रम शहरात राबविण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी साहित्य जमा करण्यासाठी टाकाऊ वस्तुंचा वापर केला, त्यामध्ये रेल्वे स्थानकावर फेकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जमा करण्यात आल्या. शेतातील साधारण: सुकलेल्या तुरीच्या खोडक्या जमा करुन त्यापासून तिपाई तयार करण्यात आली. जेवढे पाणी कमी झाले तेवढाच पाण्याचा पुरवठा मातीच्या भांड्यात होण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. भांडयातील पाणी जास्तीत जास्त टिकण्यासाठी सी.एस.एल. या तंत्राचा वापर प्रत्येक पाणपोईला करण्यात येत आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी सावली प्रतिष्ठानचे संयोजक राम धनगर, वैभव गौरकर, सुनिल हेंद्रे, रुपेश काबरा, अजय यादव, रुपाली धनगर, रोहीदास धनगर, ऋषाली बाभणे, प्रविण होनमने, रेश्मी मोहटे, निखिल मोहटे, पंकज गाडेकर, पवन गाडेकर, शिवम मुंदडा, निखिल पखाले, अक्षय राठोड, बंडु गव्हाणे, प्रदिप नवघरे, ज्ञानेश्वर नवघरे, मारोती गजभार, शंकर कालापाड, सागर बदामकर, संदिप इंगळे, विकेश डोंगरे, गजानन खंडारे, आदित्य बोडखे, प्रविण इंगोले, अक्षय कालापाड, ऋषिकेश बाभणे, शांतीलाल शिंदे असे अनेक सदस्य आपल्या वेळातील वेळ काढून साहित्य निर्मितीसाठी परिश्रम घेत आहेत. सदर उपक्रमाला वाशिम येथील प्रा. प्रकाश राठोड यांनी ४० फिडर्स देवून या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
दिवसेंदिवस पशु-पक्ष्यांची घटती संख्या लक्षात घेता सावली प्रतिष्ठानच्यावतिने आधुनिक सि.एस.एल तंत्राचा वापर करुन पक्ष्यांसाठी पानवठे तयार केल्या जात आहेत. या पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. - राम धनगर सावली प्रतिष्ठान संयोजक