नवी मुंबई : पावणे येथील गारमेंट कंपनीतील सुमारे ५०० कामगारांना गेल्या दीड वर्षापासून वेतन मिळालेले नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा तोटा झाल्याच्या कारणावरून कंपनीने कामगारांचे वेतन थकवलेले आहे. यामुळे सदर कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.पावणे एमआयडीसी येथील द शर्ट इंडिया कंपनीचे कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. नोटाबंदीच्या काळापासून त्यांना कंपनीने पगार दिलेला नाही, यामुळे मनसे व सेना कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांनी नाइलाजास्तव संपाचा मार्ग पुकारला आहे. कंपनीने त्यांना वेळोवेळी थकित वेतन देण्याचे आश्वासन देऊन ते पाळलेले नाही. या बाबत कामगारांनी कंपनीच्या मालकांकडे चौकशी केली असता, नोटाबंदीच्या निर्णयानंतर कंपनी तोट्यात गेल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले; परंतु कंपनीला कामाच्या आॅर्डर मिळत असतानाही त्या नाकारल्या जात होत्या, असा कामगारांचा आरोप आहे. तसेच नोटाबंदीच्या नावाखाली कंपनी बंद करण्याचा कट रचत असल्याचीही शक्यता कामगारांकडून वर्तवली जात आहे. कामगारांनी दोन युनियनमार्फत न्याय मिळवण्याचा प्रयत्न झाला असता, सुरुवातीला चार महिन्यांचे थकित वेतन त्यांना कंपनीतर्फे देण्यात आले. मात्र, त्यानंतर उर्वरित वेतन देण्यास कंपनी असमर्थता दाखवत असल्याने कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दीड वर्षापासून अनेक जण हालाखीचे जीवन जगत आहेत. या कालावधीत बहुतेक जणांनी भविष्यासाठी जमा केलेल्या ठेवीच्या रकमा अथवा बनवलेला ऐवज मोडित काढल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कामगार निवृत्तीच्या टप्प्यात आहेत. या सर्वांपुढे भविष्याची चिंता सतावत असल्याने त्यांच्याकडून न्याय मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. सद्यस्थितीला कंपनीकडून वेतनच मिळत नसल्याने कार्यालयीन कामगार वगळता इतर कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. या सर्वांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याची खंत कामगार मनोहर जठार व रवि गावकर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत कंपनीचे मालक अश्विन शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.कंपनीतील ५०० हून अधिक कामगारांचे दीड वर्षांपासूनचे थकित वेतन मिळावे, यासाठी कामगारांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्यानुसार मनसे शहर अध्यक्ष राज ठाकरे यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत कामगारांनी न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले, त्यानुसार कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.
नोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 12:46 AM