- संजय देशमुख
जालना : महाराष्ट्राचा विचार करता ५० हजार कोटी रुपयांच्या डेडिकेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असून, त्यासाठी राज्य सरकारसह त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यातील अडथळे दूर करणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रेल्वेची कामे कधीही न संपणारी असतात. ती कामे एका रात्रीत किंवा एखाद्या वर्षात पूर्ण होतीलच असे नसते. त्यामुळे जी कामे हाती घेतली आहेत, त्यातील कामांचे प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्यावर भर असतो. महिनाभरापूर्वीच आपल्याकडे या खात्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी सोपविली आहे. या महिनाभरात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यातील प्राधान्यक्रम समजावून घेतला. त्यात महाराष्ट्रासाठी सर्वांत महत्त्वाचा म्हणजे डेडिकेटेड कॉरिडॉर हा ५० हजार कोटींचा प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून, यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. मुंबईजवळील पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी देखील याबाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
कॉरिडॉर जेएनपीटीला जोडणार डेडिकेटेड कॉरिडॉर मुंबईतील जेएनपीटी या मालवाहतूक बंदराला जोडणार आहे. रेल्वेने होणारी मालवाहतूक थेट जेएनपीटीच्या बंदरात गतीने पोहोचण्यास याची मोठी मदत होईल, असे दानवे यांनी सांगितले.
खासदारांची बैठक घेणार मराठवाड्यातील रेल्वे समस्यांवर मार्ग काढण्यासह रेल्वेची कोणकोणती कामे ही प्राधान्यक्रमाने मराठवाड्यात आवश्यक आहेत, त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी लवकरच मराठवाड्यातील १२ खासदारांची बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. त्यासंदर्भातील सूचना नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना सकाळीच दिल्याचे दानवे यांनी सांगितले.
चाळीस दिवस मतदारसंघापासून दूर ७ जून रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात त्यांना अत्यंत महत्त्वाची अशी तीन खाती मिळाली. रेल्वेसह कोळसा आणि खाण ही खाती त्यांना देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्ली न सोडण्याची सूचना केली होती. मतदारसंघातील हजारो चाहत्यांनी दिल्लीत येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या; परंतु सलग चाळीस दिवस आपण आपल्या मतदारसंघापासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.