मुंबई : राज्यातील पोलीस बळ कमी आहे. पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ आणि पोलीस व्यवस्था बळकट केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधिमंडळात केली. तसेच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात जुन्या, मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांच्या नव्या इमारती उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आर. आर. पाटील गृहमंत्री असताना ६० हजार पोलिसांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्या काळात दहा हजार पोलिसांची भरती करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील ५ हजार २०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील सात हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार लवकरच तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जाईल, असे आश्वासनही वळसे-पाटील यांनी दिले.
अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत पोलीस विभागाने मोठी कारवाई केली. मात्र एनसीबीसारखी राज्य पोलीस दलाला प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यात ७,१८७ गुन्हे दाखल झाले असून, १५४ कोटी ४२ लाख किमतीचे ३५ हजार ७०० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३३ लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या तुलनेत अमली पदार्थाच्या विरोधातील राज्याच्या तपासात दर्जा असून काही ग्राम कारवाईवर न थांबता मोठी जप्तीची कारवाई महाराष्ट्र पोलीस दलाने केल्याचे त्यांनी सांगितले.
‘बदलीसाठी पैसे मागितल्यास थेट तक्रार करा’
पोलीस बदल्यांबाबतही गृहमंत्र्यांनी भाष्य केले. बदलीसाठी कुणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. जर कुणी पैसे मागत असेल तर माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांची नवी इमारत उभारली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री यांनी यावेळी केली.