रूपेश उत्तरवार , यवतमाळविधानसभा निवडणुकीत केवळ राजकीय पक्षांचेच बिग बजेट असते असे नाही. विधानसभा निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक विभागाला २८८ मतदार संघासाठी ५०८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यातील २५४ कोटींचा निधी वळता झाला आहे. मात्र, एवढाच निधी आणखी या निवडणुकीसाठी लागणार आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. प्रशासकीय स्तरावर सर्व यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज आहे. २८८ मतदारसंघांतील निवडणुकीचे नियोजन निवडणूक विभागाने केले आहे. त्यानुसार राज्याला निवडणुकीचा खर्च ५०८ कोटी रुपये येणार आहे. यातील अर्धा निधी सामान्य प्रशासन विभागाने जिल्ह्यातील निवडणूक विभागाकडे वळता झाला आहे. प्रशिक्षणापासून ते मतमोजणीपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला मानधन दिले जाते. यासोबतच निवडणुकीसाठी परराज्यातून मतदान यंत्र आणावे लागले. त्यासाठी वाहतुकीचा खर्च झाला. या मशीन प्रत्येक गावातील मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनांची आवश्यकता असते. त्या वाहनांनाही भाडे द्यावे लागते. उपद्रवी केंद्रावरच्या हालचाली टिपण्यासाठी आणि निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हीडीओ चित्रीकरण केले जाते. यासाठी कॅमेरे भाड्याने घेतले जातात. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, भोजन, बॅरिकेटस्, भत्ते, मतदार जागृतीचे फलक, सुरक्षा, निरीक्षक, सुक्ष्म निरीक्षक यांच्यावर हा खर्च होतो.
विधानसभा निवडणुकीचे ५०८ कोटींचे बजेट!
By admin | Published: October 13, 2014 5:12 AM