लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सध्या पुरंदर तालुक्यात लग्नाचा हंगाम जोरात सुरु आहे. नारायणपूर येथील बोरकर कुटुंबातील नवरदेव चक्क बैलगाडीतून लग्नाला आला. संपूर्ण बाजारपेठेतून मिरवणूक जात असताना नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी करून हा सोहळा पाहत होते.बाजीराव काळुराम बोरकर यांचे चिरंजीव नाथसाहेब बोरकर आणि शिवरी येथील पंढरीनाथ दत्तात्रय कदम यांची कन्या स्वाती कदम यांच्या लग्नात ही शक्कल लढवण्यात आली. वधूकडची मंडळी चार चाकी गाड्यांतून आली. मात्र वरपित्याने नवीच शक्कल लढवली. अनेक गावांमध्ये तर बैलगाड्या पाहायलाही मिळत नाही. मात्र बोरकर यांनी आधुनिक काळातही शेतीचे आणि बैलाचे नाते कायम राहावे, तसेच कोणतेही प्रदूषण न होता लग्नसोहळाही पर्यावरण पूरक व्हावा यासाठी नवी कल्पना अमलात आणायचे ठरवले. घरातील बैलगाडी होतीच, त्याबरोबरच गावातील आणि परिसरातील मित्रांना लग्नाला येताना बैलगाडी घेऊन येण्याचे विनंतीपूर्वक निमंत्रण देण्यात आले.सर्वांनीच बैलगाडीचे निमंत्रण स्वीकारत सकाळीच दारात बैलगाड्या जुंपून हजर केल्या. बैलांना सजविण्यात आले. नवरदेवाच्या गाडीची सजावट विकास कामठे यांनी केली. बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरून गळ्यात घुंगऱ्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगरे लावण्यात आली. नवरदेव, मित्रमंडळी व इतर वऱ्हाड लग्न सोहळ्यासाठी निघाले. नाथशेठ बोरकर, बबन बोरकर, भारतनाना क्षीरसागर, चंद्रकांत बोरकर, अरूण बोरकर, भुजंग बोरकर, संजय न्हालवे, सदानंद बोरकर, नारायण गायकवाड , बाबुराव गायकवाड, मेघनाथ झेंडे, भगवान गोळे आदी उपस्थित होते.
५१ बैलगाड्यांतून वऱ्हाड निघाले लग्नाला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 2:00 AM