पुणे : ग्रामीण भागातून शिकण्यासाठी बीएमसीसी महाविद्यालयात येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची भोजनाची सोय व्हावी, यासाठी माजी विद्यार्थ्यांतर्फे वर्षभरात ५१ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या भोजनाबरोबरच माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमांसाठी हा निधी वापरला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बापट यांनी रविवारी ही घोषणा करताना या निधीमध्ये स्वत:चे एक लाख रुपये आणि दिवंगत बंधू दीपक बापट यांच्या नावे एक लाख रुपये असे एकूण दोन लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.मेळाव्यात बापट यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा, राज्य सहकारी बॅँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापन शास्त्रातील तज्ज्ञ अशोक जोशी यांना ‘प्राइड आॅफ बीएमसीसी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेता अमेय जोग याला बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार, गायक जितेंद्र भुरुक यांना सुहास कुलकर्णी पुरस्कार, सुहास धारणे यांना वरुणराज भिडे पुरस्कार, दिलीप ओक व संजय चितळे यांना व्यापार भूषण पुरस्कार आणि संजय टकले यांना कांता मगर पुरस्कार देण्यात आला. संगणक अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे ‘भारतीय अर्थव्यवस्था : आव्हाने आणि संधी’ विषयावर व्याख्यान झाले. गोडबोले म्हणाले, ‘‘जागतिकीकरणातील बदल स्वीकारताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलही लक्षात घ्यायला हवेत. देशात सक्षम विकास साधताना शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यावर अधिक गुंतवणूक व्हावी, यासाठी सरकारवर दबाव टाकणे आवश्यक आहे.’’ चिं. ग. वैद्य यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
गरजू विद्यार्थ्यांसाठी ५१ लाखांचा निधी
By admin | Published: March 07, 2016 2:05 AM