लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात निवडणूक काळात बेहिशेबी रक्कम सापडत असते. या रकमेच्या जप्तीची कारवाई करून स्वस्थ न बसता ही रक्कम नेमकी कोणाकडून कोणाला जाणार होती, याची पाळेमुळे खणून काढण्याच्या सक्त सूचना पोलिस, तसेच संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.
कालच्या एकाच दिवसात ५२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक काळात एकूण ३६६ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. आचारसंहिता, सोशल मीडिया आदींशी संबंधित प्रकरणांचा त्यात समावेश होता. यापैकी ३०० गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखलही झाले असून आता त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
चोपड्यात कारमध्ये आढळले ३० लाख; नगरमध्ये जप्त केले ७ लाख
जळगाव/अहिल्यानगर : मध्य प्रदेशातील बलवाडी येथून जळगावकडे जाणाऱ्या एका वाहनात ३० लाखांची रक्कम आढळून आली. चोपडा येथील तिरंगा चौकात बुधवारी मध्यरात्री या वाहनाची तपासणी केली असता ही रक्कम आढळली. ही रोकड वाहनासह चोपड्यातील महसूल विभागाकडे देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर दुसऱ्या घटनेत अहिल्यानगर येथे नगर-पुणे रस्त्यावर कायनेटिक चौकात गुरुवारी पहाटे पुण्याहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनात सात लाखांची रोकड मिळून आली.
‘ईव्हीएम’च्या शंकांचे निरसन
‘ईव्हीएम’बाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत असतात. त्याच्या निरसनासाठी गेल्या काही महिन्यांत मी स्वतः तालुकापातळीवर जाऊन कार्यक्रम घेतले. सर्वसामान्य जनतेच्या मनात जे प्रश्न होते त्यांची थेट उत्तरे दिली. हे कार्यक्रम रेकॉर्डदेखील करण्यात आले आहेत. आता ते लोकशिक्षणासाठी दाखविण्यात येत असल्याचे किरण कुलकर्णी यांनी सांगितले.