ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 - प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग 52 तासांच्या स्वयंपाकाच्या विक्रमाला नागपुरात शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. जागतिक विक्रमासाठी होणाऱ्या या अद्वितीय स्वयंपाकादरम्यान तीन दिवस ते सलग खाद्यपदार्थ बनवणार आहेत.
मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स येथे या मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात विष्णू मनोहर हे सलग 52 तासांत एक हजारपेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करून विश्वविक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. याआधी 40 तास स्वयंपाकाचा जागतिक विक्रम आहे. तो मोडण्याचा प्रयत्न नागपुरात होणार आहे. 12 मार्च 2014 रोजी 40 तास कुकिंगचा विक्रम अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांच्या नावावर आहे.
शुक्रवारी सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. सलग तीन दिवस हा खाद्यपदार्थांचा उत्सव चालणार आहे. या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले जातील. केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील असतील.
विक्रमाची वैशिष्ट्यं
- स्वयंपाकासाठी आठ शेगड्यांची तयारी
- एसींनी सुसज्ज स्वयंपाकगृह, चित्रिकरणासाठी कॅमेरे, १२० मदतनीस
- दर एक तासाने पाच मिनिटांचा ब्रेक
- प्रचंड प्रमाणात लागणा-या स्वयंपाकाचे साहित्य
- उपस्थितांना चाखायला मिळेल पदार्थांची चव
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सराव
- यू ट्युबवर जाणार व्हिडीओ
- संत गजानन महाराज यांच्या पोथीचे सलग पारायणाचे आयोजन