पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने २४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या ५३ महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना अनुदानावर घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. स्वत: उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संबंधित महाविद्यालयांना याबाबत पत्र पाठविले असून, येत्या २५ सप्टेंबरपूर्वी आवश्यक माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडूनही या संदर्भातील तपशीलवार माहितीचे संकलन केले जात आहे.राज्य शासनातर्फे २४ नोव्हेंबर २००१ पूर्वी कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी देण्यात आलेली नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या, विषय यांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार उच्च शिक्षण संचालक कार्यालयास संबंधित महाविद्यालयांची तपशीलवार माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च शिक्षण विभागातर्फे अनुदानावर घेतल्या जाणाºया महाविद्यालयांची, विद्याशाखा, तुकड्या व विषयांची विभागनिहाय व सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संबंधित महाविद्यालयाची तपासणी करताना कोणत्या गोष्टी नोंदविल्या जाव्यात, हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या तपासणीला सुरुवात केली आहे.संबंधित महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोईसुविधा आहेत किंवा नाहीत याचा आढावा तपासणीदरम्यान घेतला जाणार आहे. तपासणी सूचीमधील प्रत्येक मुद्याची संबंधित महाविद्यालयाकडून पूर्तता केली जाते किंवा नाही, हे नमूद करावे लागणार आहे. शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार सहसंचालक कार्यालयांकडून संबंधित महाविद्यालयांची तपासणी केली जाणार आहे. मात्र, यादीत समाविष्ट नसलेल्या आणि शासनाकडून मान्यता मिळालेल्या २४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या नवीन महाविद्यालयांची, विद्याशाखांची, अतिरिक्त तुकड्यांची, विषयांची तपासणी करून स्वतंत्ररीत्या त्यांचा समावेश करावा. तसेच त्यांचा अहवालही सादर करावा, असे आदेश राज्याचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी काढले आहेत.राज्यातील महाविद्यालयांकडून आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातील पुढील कार्यवाहीसाठी येत्या १ आॅक्टोबर रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ५३ महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानावर घेण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होऊ शकते, असे अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.शासन आदेशानुसार काही महाविद्यालयांना, विद्याशाखांना, तुकड्यांना व विषयांना अनुदानावर घेण्यासंदर्भातील आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाºया पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील २१ महाविद्यालयांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियोजित वेळेत संबंधित अहवाल शासनास सादर केला जाणार आहे.- डॉ. विजय नारखेडे, सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग
राज्यातील ५३ कॉलेजचे कर्मचारी अनुदानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:15 AM