मुंबई: बुलेट ट्रेनसाठी 13.56 हेक्टरवर पसरलेल्या खारफुटींची कत्तल केली जाणार आहे. सोमवारी राज्य सरकारनं याबद्दलची माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी तब्बल 54 हजार खारफुटींवर कुऱ्हाड पडणार आहे. यासंबंधी शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला सरकारकडून उत्तर देण्यात आलं. बुलेट ट्रेनसाठी कापण्यात येणाऱ्या झाडांच्या पाचपट झाडांची लागवड सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. बुलेट ट्रेनसाठी उंच खांब उभारण्यात येतील. त्यामुळे खारफुटी आणि पर्यावरणाला कमी धोका असेल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिली. 'नवी मुंबईत खारफुटी कापल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्या भागात समुद्राचं पाणी शिरणार नाही. या प्रकल्पाचा फटका बसणाऱ्या स्थानिकांसोबत सध्या चर्चा सुरू असून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल,' असं रावतेंनी सांगितलं. या प्रकल्पासाठी एकूण 1,379 हेक्टर जागा ताब्यात घेण्यात असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.राज्य सरकार बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळीत खासगी जागा खरेदी करणार आहे. या याशिवाय पालघरमधील 188 हेक्टर जागादेखील सरकारकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. याची झळ 3,498 कुटुंबांना बसणार आहे. तर ठाण्यातील 84.81 हेक्टर जमीन सरकारकडून ताब्यात घेतली जाणार आहे. ही जमीन 6,589 शेतकऱ्यांकडे आहे. यापैकी 2.95 हेक्टर जमीन सरकारनं खरेदी केली आहे.
बुलेट ट्रेन निसर्गाच्या मुळावर; राज्यात 54 हजार खारफुटींची कत्तल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 2:59 PM