मुंबई : मेल-एक्सप्रेसप्रमाणेच एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय, बम्बार्डियर लोकलसारखी आसने, एका डब्यात तब्बल ३० टनांचे एसी आणि ५ हजार ९६४ प्रवासी क्षमता इत्यादी सोयीसुविधा असलेली एसी (वातानुकूलित) लोकल सोमवारी मध्यरात्री मुंबईत दाखल झाली. या लोकलमधील अनेक इलेक्ट्रीकल कामे पूर्ण केल्यानंतर एसी लोकलच्या चाचण्या करण्यात येतील आणि साधारपणे दोन ते तीन महिन्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.या एसी लोकलची बांधणी ही रेल्वेच्या चेन्नईतील ‘आयसीएफ’मध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) करण्यात आली आहे. बारा डब्यांच्या असलेल्या एसी लोकलचे डबे सहा-सहा डब्यांत विभागण्यात आले आहेत. या लोकलची बांधणी करण्यास तब्बल ५५ कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. या गाडीला स्वयंचलित दरवाजे असले तरी आपत्कालिन परिस्थितीत हे दरवाजे प्रवासी उघडू शकतील, अशी व्यवस्था आहे. आपत्कालीन प्रसंगात गार्डशी देखील प्रवासी डब्यातील यंत्रणेद्वारे संवाद साधू शकतील. या लोकलची चाचणी १६ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
५५ कोटींची एसी लोकल मुंबईत दाखल
By admin | Published: April 06, 2016 5:09 AM