नागपूर : नक्षलवाद केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम व घनदाट जंगल भागापुरता मर्यादित राहिला नाही. नक्षल्यांनी महानगरातही आपले नेटवर्क विस्तारले आहे. शहरी भागात त्यांच्या जवळपास ५५ फ्रंटल संघटना कार्यरत असल्याचे उघड झाले असून, मुंबई, पुण्यासह विविध महानगरांत त्यांचा छुपा प्रसार सुरू आहे, अशी धक्कादायक माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांनी दिली.नक्षलविरोधी अभियान व अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र यांच्यावतीने सुराबर्डी येथे आयोजित केलेल्या नक्षलविरोधी प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य समशेर सिंग, अभियानाचे पोलीस उपअधीक्षक संजीव म्हैसेकरउपस्थित होते.आतापर्यंत जेथे दळणवळणाची कमतरता आहे, प्रशिक्षित तरुण वर्ग नाही, विकास आणि शिक्षणाच्या सुविधा नाहीत, अशा भागांत नक्षलवादी स्थानिकांची दिशाभूल करायचे. मात्र, त्यांनी आता मोठ्या शहरांकडे मोर्चा वळविला आहे, असे सांगून बोडखे म्हणाले, ‘गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील जंगलात सशस्त्र नक्षलवादी पोलिसांसोबत प्रत्यक्ष युद्ध करतात, तर शहरी भागांत त्यांच्या फ्रंटल संघटना विविध आंदोलने करतात. या माध्यमातून शासनाविरोधात असंतोष निर्माण करण्याची दुहेरी रणनीती नक्षलींनी अवलंबिली आहे.’मुंबई, ठाणे, पुणे, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आदी भागांत त्यांचा छुपा प्रसार सुरूआहे. जंगल भागात पोलिसांना लक्ष्य आणि विकासकामांना विरोध एवढाच नक्षलवाद आपल्याला माहीत आहे. मात्र, या फ्रंटल संघटनांची कार्यपद्धती शहरी भागांत पूर्णपणे वेगळी आहे. कबीर कला मंच, भारत जन आंदोलनसारख्या संघटना कामगार आणि विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. मार्क्स, लेलिन, माओचे तत्त्वज्ञान सांगून, त्यांच्या मनात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम या संघटना करीत आहेत. त्यामुळे अशा संघटनांची माहिती गोळा करून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज असल्याचे बोडखे म्हणाले. (प्रतिनिधी)
नक्षलींच्या ५५ फ्रंटल संघटना
By admin | Published: June 21, 2016 4:12 AM