ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने भारतीय चलनातील रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या तब्बल ५५ लाख २७ हजारांच्या जुन्या नोटा पकडल्या. या नोटा बदलण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी आयकर विभागामार्फत सुरू आहे. पकडलेल्या जुन्या नोटांमध्ये सर्वाधिक एक हजारांच्या नोटांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.कोरम मॉलजवळ एक जण जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रिक्षामधून येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना मिळाली होती. त्यांनी लावलेल्या सापळ्यात व्यापारी अडकला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ३९ लाख ३ हजार रुपयांच्या एक हजाराच्या ३,९०३ जुन्या नोटा तर १६ लाख २४ हजार रुपयांच्या पाचशेच्या ३,२४८ जुन्या नोटा अशा एकूण ५५ लाख २७ हजारांच्या नोटा मिळाल्या. हा व्यापारी या रद्द झालेल्या नोटा बदलण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विजय दळवी, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, शशिकांत माने या पथकाने केली. (प्रतिनिधी)
५५ लाख २७ हजारांच्या जुन्या नोटा पकडल्या
By admin | Published: March 16, 2017 3:56 AM