आरोग्य विभागाचे अभियान : जंतनाशक गोळ्या देणार
हर्षनंदन वाघ / ऑनलाइन लोकमत -
बुलडाणा, दि. 30 - शहरासह ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी शुध्द पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे बालकांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो. या कृमीमुळे जवळपास ५५ टक्के बालकांना रक्ताक्षय होवून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अशा बालकांना रक्ताक्षय होवू नये म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने २ व ७ सप्टेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात १ ते १९ वयोगटातील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये आतड्यांचा कृमीदोष आढळून येतो. बालकांमध्ये होणारा दीघर्कालीन कृमीदोष हा मुलांना कुपोषित करणारा असल्यामुळे राज्यात २ सप्टेंबर हा राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शाळेतच जंतनाशक गोळ्या या दिवशी दिल्यानंतर किमान दोन तास या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याचे आदेशात म्हटले आहे. यासदंर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाने २७ आॅगस्ट रोजी घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून २ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जतंनाशक दिन असल्यामुळे जंताच्या गोळ्या वाटपाची मोहिम युध्दस्तरावर राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या दिवशी विद्यार्थी उपस्थित नसल्यास ७ सप्टेंबर रोजी पुन्हा जंतनाशक औषधींची मात्रा देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
पोळा सणावर परिणाम होण्याची शक्यता
विदर्भातील शेतकºयांच्या जीव्हाळ्याचा सण असलेल्या पोळ्याच्या दुसºया दिवशी तान्हा पोळ्याला विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. पोळा सणानिमित्त अनेक विद्यार्थी गावाकडे जातात. तसेच ते तान्हा पोळ्याचा उत्सवात भाग घेतात. त्यामुळे तान्हा पोळ्याच्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती किती राहिल, अशा प्रश्न उपस्थित होत असून या उत्सवाचा आरोग्य विभागाच्या मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दुषित पाण्यामुळे लहान बालकांमध्ये आतड्याचा कृमीदोष आढळतो. त्यामुळे रक्ताक्षय आदी आजार होतात. यासाठी २ व ७ सप्टेंबर रोजी ही राष्ट्रीय जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविली जाणार आहे. १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या शाळेतच द्याव्या लागणार आहेत.
- डॉ.शिवाजीराव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.
जंतनाशक गोळ्या वाटपाच्या मोहिमेत आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांसह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. त्याचा फायदा १ ते १९ वर्षाच्या बालकांना होणार असून कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
- डॉ.अरूण जवंजाळ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, हतेडी बु., ता.बुलडाणा.