मनीषा म्हात्रे,
मुंबई- मुंबईतून अल्पवयीन मुलींना चोरी करणारी टोळी सक्रीय झाली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या मुलींचा ५५ हजार रुपयात सौदा केला जात असल्याची धक्कादायक माहिती मुलुंड पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आली. मुलुंड पोलिसांनी कल्याणमधून अशा अनेक अल्पवयीन मुलींची सुटका केली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.मुलूंड पश्चिमेकडील अशोक नगर परिसरात ४ वर्षाची टीना कुटुंबियांसोबत राहते. सोमवारी रात्री आठच्या सुमारास घराबाहेर फटाके उडवित असताना ती गायब झाली. ही बाब कुटुंबियाच्या लक्षात येताच त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत तिचा शोध घेत असताना नातेवाईकांना खात्रीलायक सूत्रांकडून यामागील संशयिताची माहिती मिळाली. दिलीप धुरिया (३४) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ठाण्याच्या घरी धाड टाकली मात्र तो हाती आला नाही. अखेर मंगळवारी त्याला डम्पिग रोड येथून ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुह्याची कबूली दिली. तेव्हा त्याने मुलीला ५५ हजार रुपयात विकल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच मुलीला कल्याण येथे डांबून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी कल्याण येथील घरावर छापा टाकला तेव्हा पोलिसांचेही डोळे फिरले. मुळात या चिमुरडीसोबत आणखीन एका चिमुरडीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या मुलींची सुखरूप सुटका केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या ३० मिनिटातच या मुलींना बंगाल येथे नेण्यात येणार होते. मात्र मुलुंड पोलिसांच्या कामगिरीमुळे या चिमुकल्यांची सुटका झाली. त्या परिसरातून ४ तरुणी आणि ४ पुरुषांनाही ताब्यात घेतले. तर या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र यांच्या चौकशीत विविध आणखीन काही चिमुकल्यांची सुटका करण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत अधिक तपास सुरु असल्याने मुलूंड पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.>मुलीच्या शोधातही आरोपीचा बनाव दिलीप हा हरविलेल्या मुलीचा नातेवाईक आहे. मुळात त्याने खाऊचे अमिष दाखवून मुलीचे अपहरण केले. ओळखीचा असल्याने मुलीने विश्वास ठेऊन त्याच्यासोबत गेली. मुलीला रात्रीच टोळीच्या स्वाधीन करत तो घरी परतला. शिवाय सकाळी ४ ते ६ दरम्यान मुलीला शोधण्यासाठी तोही तिच्या वडिलांसोबत धावाधाव करत होता.>असा फुटला डावदिलीप हा मित्र तूफानी आणि अनिल विश्वकर्मासोबत राहतो. रविवारी रात्री तो घरी आला तेव्हा अनिल झोपल्याचे समजून तूफानीने दिलीपकडे मुलींच्या चोरीबाबत विषय काढला.एका मुलीमागे ५५ हजार मिळतील असे बोलणे झाले. त्याचा मित्र तूफानीसोबत मुलीच्या चोरीबाबत चर्चा करत असताना ही बाब अनिलने ऐकली.मात्र तो खरच असे करेल यावर त्याला विश्वास नव्हता. सकाळी जेव्हा मुलगी गायब झाल्याबाबत त्याला समजले त्याने ही बाब तिच्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांसाठी सापळा रचला. आणि तुफानीला पैसे देण्यासाठी आलेल्या टेम्पोचलाकासह पोलिसांनी तुफानीला बेडया ठोकल्या. त्याच्या चौकशीत या टोळीचे बिंग फुटले. पोलिसानी शिताफिने या टोळीच्या मुसक्या आवळल्याची माहिती अनिलने लोकमतला दिली.