अंबाजोगाई : बीड येथील नातेवाईकांनी चुकुन नेलेल्या त्या मृतदेहाचा प्रवास पुणे ते अंबाजोगाई व पुन्हा अंबाजोगाई ते बीड येण्या-जाण्यामुळे साडेपाचशे किलोमीटरपर्यंत झाला. अखेर सोमवारी त्या मयत व्यक्तीवर बोरीसावरगाव येथे अंत्यसंस्कार झाले.
बीड येथून आलेल्या ३५ वर्षीय तरूणाचा येथील स्वाराती रूग्णालयात न्यूमोनियामुळे शनिवारी मृत्यू झाला. शवागारात ठेवलेला त्याचा मृतदेह नातेवाईक घेऊन गेले. घरी गेल्यानंतर तो मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नसल्याचे लक्षात येताच तो परत अंबाजोगाईला आणण्यात आला. बोरीसावरगाव येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा तो मृतदेह होता.
बोरीसावरगाव येथील माधवराव दाजीसाहेब देशमुख (६४) हे आपल्या मुलाकडे फ्रान्सला गेले होते. एक महिन्यापूर्वी भावजयीचे निधन झाल्यामुळे ते पुण्याला गेले होते. नंतर माधवरावांना न्यूमोनियाचा त्रास जाणवू लागला. पुण्याच्या खाजगी रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. माधवरावांचा मुलगा फ्रान्स येथून सोमवारी येणार असल्याने त्यांचा मृतदेह स्वारातीच्या शवागारात शनिवारी ठेवण्यात आला. परंतु, बीडच्या रूग्णाचा मृतदेह नेण्याऐवजी माधवराव देशमुख यांचा मृतदेह नेण्यात आला. घरी गेल्यानंतर हा मृतदेह आपला नसल्याचे लक्षात येताच तो परत अंबाजोगाईला आणण्यात आला. त्यानंतर आपल्याच नातेवाईकाचा मृतदेह घेऊन नातेवाईक बीडला गेले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता देशमुख यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केला.या प्रकाराची चौकशी करण्यासाठी स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी डॉ. शंकर धपाटे, डॉ. दीपाली देव, डॉ. विश्वजीत पवार यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद दोडे यांचा पदभार काढला आहे.