हितेन नाईक/अनिरुद्ध पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पालघर जिल्हा आणि गुजरात राज्यातून पोरबंदर, वेरावल, ओखा येथील ट्रॉलर्समध्ये खलाशी कामगार म्हणून कामाला गेलेल्या सुमारे १ हजार ८०० कामगारांना जिल्ह्याच्या बॉर्डरपासून सात किलोमीटर्सवरील नारगोल बंदरात उतरविण्यात आले आहे. यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील सुमारे साडेपाचशे कामगारांना गुजरात पोलिसांनी जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर उतरवण्याची परवानगी नाकारल्याने त्यांना पुन्हा पोरबंदरला नेऊन बेवारसरीत्या सोडण्यात आल्यास त्यांच्या जीविताचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राज्य सरकारने याबाबत यशस्वी मध्यस्थी करण्याची मागणी त्या खलाशांच्या नातेवाइकांनी केली आहे.
गुजरात राज्यातील नारगोल, मरोली, वलसाड, बिलीमोरा, नवसारी, झाई, तडगाव, कोसंबा, उंबरगाव येथील हजारो ट्रॉलर्स घेऊन मच्छीमार मालक पावसाळी बंदी कालावधी संपल्यानंतर मासेमारी करण्यासाठी पोरबंदर, ओखा, सौराष्ट्र, वेरावल येथे जात असतात. या ट्रॉलर्समध्ये खलाशी कामगार म्हणून काम करण्यासाठी डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आदी भागांतील लोक जात असतात. पाच आकडी पगार आणि अद्ययावत सामग्री या ट्रॉलर्समध्ये असल्याने येथील कामगार जिल्ह्यातील अन्य बंदरात काम करण्याऐवजी पोरबंदर, वेरावल या भागाला प्राधान्य देत असतात.
हे ट्रॉलर्स एक-एक महिना समुद्र्रात मासेमारी करण्यासाठी पाकिस्तान, श्रीलंका बॉर्डर ते थेट गोवा भागातील समुद्र घुसळून काढीत असतात. माकुल (आॅक्टोपस), नळे, बगा, ढोमा, पापलेट, कोलंबी या चीन, थायलंड आदी परदेशात निर्यात होणाऱ्या माशांची मच्छीमारी हे ट्रॉलर्स करीत असतात.कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या दहशतीने सर्व जिल्ह्यांनी आपल्या सीमा लॉक करीत प्रवेशबंदीची अंमलबजावणी कठोरपणे सुरू केली आहे. या सर्वाचा परिणाम आपसूकच मच्छीमार व्यवसायावर झाल्याने नारगोल, वलसाड, उंबरगाव, कोसंबा आदी भागांतून पोरबंदर, वेरावल भागात गेलेल्या ट्रॉलर्सना घराकडे वळावे लागले होते. या २५ ते ३० ट्रॉलर्स प्रत्येकी ७० ते १०० खलाशी घेऊन शुक्रवारी आपल्या घराकडे आल्या असताना ग्रामस्थांनी कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने या ट्रॉलर्समधील कामगारांना किनाºयावर उतरण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे हे ट्रॉलर्स तीन दिवस समुद्रात सुरक्षित किनारा शोधत होते.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी गुजरात सरकारच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्यानंतर रविवारी सकाळी या ट्रॉलर्सना नारगोल बंदराचा आश्रय मिळाला. गुजरात पोलीस, महसूल विभाग आणि आरोग्य यंत्रणेने या ट्रॉलर्सचा ताबा घेत सर्व खलाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चे स्टॅम्प मारीत १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी कामगारांना मात्र खाली उतरण्यास पोलिसांनी मज्जाव केला.
जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाहीनारगोलमध्ये उतरलेल्या १,८०० कामगारांपैकी १,१२२ कामगार हे गुजरातमधील आहेत. उरलेल्या ६७८ कामगारांतील काही कामगारांना सिल्वासा-दमण प्रशासनाने स्वीकारले असून, अन्य उरलेल्या महाराष्ट्रातील (पालघर जिल्ह्यातील) कामगारांच्या सुटकेसाठी जिल्हा प्रशासन परवानगी देत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.