ऑनलाइन लोकमत
वारणावती (सांगली), दि. 24 - चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन बिबट्यांसह ५५५ वन्यप्राणी आढळून आले आहेत. प्राण्यांची गणना ३ मे ते ११ मेअखेर करण्यात आली. त्याचा प्रजातीनिहाय अहवाल नुकताच वन्यजीव विभागाने जाहीर केला आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात दरवर्षी वन्यप्राणी गणना होते. यंदाही ३ ते ११ मेदरम्यान ही गणना झाली. ट्रान्झीट लाईन पद्धतीने व बुध्द पौर्णिमेदिवशी पाणवठ्यावरील गणना करण्यात आली. प्राणी गणनेसाठी १६ विभाग (बीट) करण्यात आले होते. प्रत्येक बीटमध्ये दोन ट्रान्झीट लाईन आहेत. हजार हेक्टर क्षेत्रामध्ये एक ट्रान्झीट लाईन होती. तेथे प्रत्येकी तीन प्रगणकांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळी साडेपाच ते सात या वेळेत या लाईनवरून फिरून गणना करण्यात आली. प्राण्यांची विष्ठा, झाडावरील ओरखडे यांच्या नोंदी घेण्यात आल्या. वनविभागाने त्याचा अहवाल आॅनलाईन जाहीर केला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांच्या अखत्यारीत एकूण ११६५.५७ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. त्यापैकी ६००.१२ चौरस किलोमीटर क्षेत्र कोअर झोन, तर ५६५.४५ चौरस किलोमीटर क्षेत्र बफर झोनमध्ये येते.
मुख्य वन्य संरक्षक डॉ. व्ही. कलेमेट बेन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास, कुंडल वन अकादमीचे महासंचालक सर्फराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली, वन्यजीव अधिकारी, वन कर्मचारी, वन मजूर, प्राणीमित्र व कुंडल वन अकादमीचे प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल यांच्या साहाय्याने ही गणना पूर्ण करण्यात आली. सर्व कर्मचाºयांचे ६१ गट करण्यात आले होते.
या गणनेसाठी या टप्प्यामध्ये १० विशेष प्रभाव क्षेत्र (स्पेशल इंप्रेशन पॅड) तयार करण्यात आली. पहिल्या दिवशी पॅड स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर या पॅडवरून किती प्राणी गेले, याच्या नोंदी घेतल्या. त्यानुसार तीन बिबटे, १६९ गवे, १६८ रानडुकरे, २० अस्वले, १७ सांबर, पाच शेकरु, एक गरूड, पाच साळिंदर यांच्यासह अन्य प्राणी, अशा एकूण ५५५ प्राण्यांची नोंद झाली आहे.
दरम्यान, निदर्शनास आलेल्या तीन बिबट्यांपैकी एक बिबट्या गोठणे नियत क्षेत्रात, तर हेळवाक वन परिक्षेत्रातील रूंदीव उत्तर व दक्षिण नियत क्षेत्रात प्रत्येकी एक बिबट्या आढळला आहे.