मुंबई : विमानातून बेकायदेशीरपणे सोने आयात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश हवाई गुप्तचर कक्षाने (एआययू) केला असून त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रसाधनगृहाजवळ ठेवण्यात आलेले ५६ लाख रुपये किमतची १. ८६५ किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी विमानतळावरील दोघा कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. अशरफ मेलपरम्बा आमू (वय २९, कारगोड, केरळ), आकाश मगर (२५, रा. गोरेगाव) व सुमित दलाल (२७, रा. विक्रोळी पश्चिम) अशी त्यांची नावे आहेत. मगर व दलाल हे विमानळावर स्वच्छता करणाऱ्या सिला सोल्यूशन प्रायव्हेट कंपनीतील कर्मचारी आहेत. दुबईहून एमिराईटस फ्लाईट ईके ५०६ या फ्लाईटने आलेला आमू हा विमानतळावरील प्रसाधनगृहाच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. त्याने प्रसाधनगृह व तेथील कचऱ्याच्या पेटीत दोन पाकिटे टाकल्याचे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पाकिटात सोन्याच्या १६ पट्ट्या सापडल्या. थोड्यावेळानंतर प्रसाधनगृहाच्या ठिकाणी मगर काहीतरी शोधत असल्याचे लक्षात आल्याने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळण्याचा प्रयत्न केला. त्याला विमानतळाबाहेर पकडण्यात आले. आपला वरिष्ठ अधिकारी दलाल याने प्रसाधनगृह व कचराकुंडीत टाकलेले पाकीटे आणण्यास पाठविल्याची कबुली दिली. बेकायदेशीरपणे आणलेले सोने विमानतळाबाहेर काढण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. (प्रतिनिधी)
विमानतळावरून ५६ लाखांचे सोने जप्त
By admin | Published: April 25, 2017 2:41 AM