मुंबई : राज्यसह मुंबईत स्वाइनच्या रुग्णांचा आलेख चढता आहे. मुंबईत सोमवार, २५ आॅगस्ट रोजी स्वाइनचे नवे २५ रुग्ण आढळून आले आहेत, तर १ पुरुषाचा स्वाइनमुळे मृत्यू झाला आहे. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान नागपूरमध्ये स्वाइनमुळे ७० जणांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय पुरुषाचा स्वाइनमुळे मृत्यू झाला आहे. २ आॅगस्ट रोजी या रुग्णाला गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ आॅगस्टपासून या रुग्णावर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा १९ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. मुंबईत आॅगस्ट महिन्यात १३ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे, तर जानेवारी ते २५ आॅगस्टदरम्यान स्वाइन फ्लूमुळे ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत स्वाइनचे एकूण ५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्यापासून स्वाइनची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत स्वाइनचे ५७ नवे रुग्ण
By admin | Published: August 26, 2015 3:30 AM