लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ५९ टक्के घरगुती वीज ग्राहकांनी लाॅकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांचा नियमित भरणा केलेला नाही. या ग्राहकांकडील एकूण थकबाकी ५ हजार ७७६ कोटी असून त्यापैकी सुमारे साडेचार हजार कोटींची थकबाकी लाॅकडाऊन काळातील आहे. वीज बिले थकविण्यात मुंबईकर वीज ग्राहकांची संख्या जेमतेम २५ टक्के असून उर्वरित महाराष्ट्रात तो टक्का ६४ पेक्षा जास्त आहे. मुंबईतील अदानी, टाटा, बेस्ट या तीन कंपन्यांपैकी नियमित भरणा करण्यात बेस्टचे ग्राहक पुढे आहेत. तेथे बिल थकविणारे फक्त १६ टक्के असले तरी थकबाकीची रक्कम मात्र ३४ टक्के आहे.
लाॅकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांचा भार कमी करण्यासाठी सवलत दिली जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत सातत्याने देत होते. मुंबईतील खासगी वीज वितरण कंपन्यांनीही तशी सवलत देण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, ही सवलत देणे अशक्य असल्याचे आता खुद्द राऊत यांनीच मान्य केले असून वीज ग्राहकांमध्ये त्यामुळे असंतोष आहे. वीज बिलांचा भरणा न होण्यामागे आर्थिक संकट प्रामुख्याने कारणीभूत असले तरी राज्य सरकारकडून सवलत मिळेल, या भाबड्या आशेपोटी अनेकांनी बिलांचा भरणा केला नसल्याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळेच महावितरणच्या थकबाकीदारांचा टक्का मुंबईपेक्षा अडीचपट असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एकूण घरगुती वीज ग्राहक २ कोटी ४२ हजार असून त्यापैकी १ कोटी ४४ लाख ग्राहकांची बिले थकली आहेत.
उद्योग, व्यवसायांची थकबाकी वाढलीकोरोना संक्रमणाचा फटका राज्यातील उद्योगधंद्यांनाही बसला. लघू आणि उच्चदाब विजेचा वापर करणाऱ्या उद्योगांची थकबाकी १७६२ कोटी आणि व्यावसायिक आस्थापनांची थकबाकी १४१४ पर्यंत वाढली. या ३१७६ कोटींपैकी १६४० कोटी म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त थकबाकी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील आहे.