मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. मात्र, दोन जिल्ह्यातील शिवसैनिक, नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन युती सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ५८ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच माझी भेट घेऊन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आदित्य ठाकरेंची सकाळी सभा, सायंकाळी शिवसैनिक शिंदे गटात
आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे भिवंडीत पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी चर्चा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोटो ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची 'निष्ठा यात्रा' आणि 'शिवसंवाद यात्रे'ने ही पडझड रोखली जाणार की जाणार की उलट परिणाम होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.