मुंबई : राज्यात सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिरे उभारली जात आहेत. या मंदिरांचे १५ ऑगस्टला एकाचवेळी ऑनलाइन उद्घाटन होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी पत्र परिषदेत दिली.
२६ जून या सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून संविधान मंदिरांची उभारणी करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता. या संविधान मंदिरात महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होतील. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीबाबत कार्यशाळा होईल.
घटनात्मक अधिकार, कर्तव्यांबद्दल जागरूकता वाढण्यासाठी मोहीम आयोजित करणे, घटनात्मक समस्या, दुरुस्त्या, समकालीन समाजातील घटनेची भूमिका यासारख्या विषयांना घेऊन परिसंवाद, चर्चासत्र, आयोजित करणे, राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे, यासाठी निबंध स्पर्धा व संबंधित कार्यक्रम आयोजित करणे यासह संविधानाच्या विविध पैलूंवर पुस्तके, लेख आदी गोष्टी उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा उद्देश आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.