मिलिंदकुमार साळवे /लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कागदपत्र व नियमांची पूर्तता करूनही सर्वसामान्यांना काही लाख रुपयांचे कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांनी अवघ्या सव्वा गुंठा जमिनीवर तब्बल ५८४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.हे कर्जवाटप संशयास्पद असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी नाशिक विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्याकडे केली आहे.गहाणखताच्या व्यवहारावर अहमदनगरच्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाने १० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले होते. या प्रकरणात २९ कोटी रुपयांचा मुद्रांक बुडविल्याची तक्रार राज्यातील काही आमदारांनी केली होती. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मैत्राह वायू (कृष्णा) प्रा. लि. या हैदराबाद येथील कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्पासाठी ३० मार्च २०१३ रोजी बँकांच्या समुहाशी करार करुन ५८३ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, बँक आॅफ बडोदा व विजया बँक अशा सहा बँकांच्या समुहाने पहिल्या टप्प्यात ४०० कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात १८३ कोटी ८५ लाख रुपये असे दोन टप्प्यात एकूण ५८३ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज या कंपनीस दिले. कर्जाच्या सुरक्षिततेसाठी कंपनीने बँक समुहाच्यावतीने कर्जासाठी गहाणखत करुन दिले आहे. करारात इतर स्थावर व जंगम मिळकतीचा तपशील दिलेला नाही, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. नाशिक विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्याकडे तक्रार केली आहे.- आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस.
सव्वा गुंठ्यावर तब्बल ५८४ कोटींचे कर्ज!
By admin | Published: May 06, 2017 3:48 AM