ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 21- बारावीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले सांगोला न्यू इंग्लिश ज्युनिअर स्कुलचे प्राचार्य दिलीप खडतरे (वय 59) यांनी आज सकाळी गोपाळपूर येथील इंजिनियरिंग कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. इमारतीवरून उडी मारल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्राचार्याला कॉलेजमधील कर्मचा-यांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, प्राचार्य दिलीप खडतरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संबंधीत व्यक्तीवर दाखल करा अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा खडतरे यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
सांगोला येथील न्यू इंग्लिश ज्युनिअर स्कुलचे प्राचार्य दिलीप खडतरे यांनी कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. मात्र काल पोलिसात फिर्याद दाखल झाली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या भावाच्या तक्रारीनंतर काल पोलीस त्याला अटक करण्यासाठी शाळेत गेले होते. पण प्राचार्याने तेथून पळ काढला होता. मात्र, त्याला मदत करणारा महाविद्यालयाचा शिपाई सफर्राज मुलाणी यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या मदतीने पोलिसांनी खडतरे यांचा शोध सुरू केला होता. पण पोलिसांच्या तावडीत सापडण्यापूर्वीच खडतरे यांनी आपले जीवन संपवले. आज सकाळी प्राचार्य दिलीप खडतरे यांनी सांगोल्यापासून 50 कि.मी. अंतरावरील पंढरपूर शेजारच्या गोपाळपूर येथील इंजिनियरिंग कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
अवघ्या एका वर्षानंतर प्राचार्य खडतरे सेवानिवृत्त होणार होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकिय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.