Maharashtra Politics: अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व वेतनातील फरक त्वरित द्यावा अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे.
थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थानमधील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे २० ते २२ वर्षांपासून सेवेत आहे. मागील काळात १०५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले. मात्र हे ५९८ कर्मचारी मात्र त्या नियमांपासून वंचित राहिलेले असून अजूनही कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याबाबत सरकारकडे साई संस्थानकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे.
साईबाबा संस्थान येथे २००० पासून हे ५९८ कर्मचारी कंत्राटी पध्द्तीने तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. या पगारावर त्यांचा घरखर्च तसेच मुलांचे शिक्षण होत पूर्ण नाही. गेल्या २० वर्षांपासून हे कामगार अन्याय सोसत आहे. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये वेतन मिळते तर कंत्राटी कामगारांना १० हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. सरकार याप्रश्नी सकारात्मक आहे असे म्हणत आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवत कायम करुन घ्यावे व ऑगस्ट २००९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनाचा फरक देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, असेही थोरात म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"