मुंबई : देशभरात चलनकल्लोळ झाल्यानंतर नोटा बदलण्यासाठी आणि सुट्टे पैसे मिळवण्यासाठी अनेकांनी वेटिंग लिस्टची तिकीटे काढण्यासाठी रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रावर धाव घेतली. मात्र तिकीट रद्द करुन त्याच्या दिल्या जाणाऱ्या परताव्याच्या नियमांत रेल्वे मंत्रालयाकडून बदल करण्यात आला. दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची तिकीटे रद्द केल्यास प्रवाशांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी चेकव्दारे देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर यात पुन्हा बदल करत रद्द करण्यात येणारी रक्कम ही पाच हजारापर्यंत आणण्यात आली. या बदलानंतरही आरक्षण केंद्रावर रेल्वेने ठरवून दिलेल्या जादा मुल्यांची तिकीटे काढण्याचे प्रमाण हे कमी झालेले नाही. ११ नोव्हेंबर रोजी दहा हजार आणि त्यापेक्षा जास्त रक्कमेची ३३ तिकीटे काढण्यात आली होती. १४ नोव्हेंबर रोजी हा आकडा ७६ वर गेला. तर १५ नोव्हेंबर रोजी तो ११५ पर्यंत पोहोचला. १६ नोव्हेंबर रोजी पाच हजार आणि त्यापेक्षा जास्त रक्कमेची १९६ तिकीटे काढण्यात आली. १७ नोव्हेंबर रोजी हाच आकडा १८३ एवढा असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. यातून १ कोटी ३८ लाख ३७ हजार ८२५ उत्पन्न रेल्वेला मिळाले. (प्रतिनिधी)
जादा मूल्यांची ६९८ तिकीटे आरक्षित
By admin | Published: November 19, 2016 2:20 AM