समीर कर्णुक, मुंबईमानखुर्दच्या बालसुधारगृहात गेल्या दीड महिन्यात सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब येथील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवली असून यावर तत्काळ तोडगा काढण्याची विनंती केली आहे.मुलांच्या मृत्यूच्या घटनेला मानखुर्द बालसुधारगृहाचे अधीक्षक राहुल कंठीकर यांनीही दुजोरा दिला आहे. समाजातील अनाथ, वंचित, गतिमंद आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृहे आहेत. ‘द चिल्ड्रेन्स एड सोसायटी’ या बालकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेकडे या सगळ्या सुधारगृहांचा कारभार आहे. राज्याचे गृहमंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्षपद महिला व बालविकासमंत्र्यांकडे असते. मात्र या नेत्यांना बालसुधारगृहांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नसल्याने या सुधारगृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मुंबईतील या आठ बालसुधारगृहांपैकी मानखुर्दमधील बालसुधारगृहात सामान्य मुलांसोबत गतिमंद व विविध आजारांनी ग्रासलेल्या मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या उपचारासाठीची सामग्री, औषधांसाठी पैसाही तिजोरीत नसल्याने येथे ही मुले तडफडत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुलांना राहण्यासाठी योग्य जागा नाही, पौष्टिक अन्न नाही, कपडे नाहीत, पिण्यासाठी योग्य पाणी नाही अशा अनेक समस्या येथे मुलांना भेडसावत आहेत. शासनाकडून एका मुलामागे केवळ ६३५ रुपये निधी दिला जातो. यामध्ये मुलांचा खर्च भागवणे अत्यंत कठीण जात असल्याने देणगीदार शोधण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.योग्य उपचारांअभावी मुलांचा मृत्यू ओढवत आहे. गेल्या दीड महिन्यात ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले अल्पवयीन असून यात एका मुलीचाही समावेश आहे.
मानखुर्द बालसुधारगृहात ६ मुलांचा मृत्यू
By admin | Published: October 05, 2016 5:49 AM