मुंबई : माथेरानची राणी म्हणून ओळख असणारी मिनी ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या सात महिन्यांपासून सायडिंगलाच आहे. सुरक्षेची पूर्तता केल्याशिवाय ही ट्रेन सुरू करणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने तातडीने ६.८ कोटींचा आर्थिक निधी मंजूर केला आहे. माथेरानची मिनी ट्रेन दोन वेळा रुळावरून घसरल्याच्या घटनेनंतर मे २०१६ पासून ट्रेनची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात असून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून नुकताच पाहणी दौरा केला होता. माथेरानच्या ज्या भागातून ही मिनी ट्रेन धावते त्या भागात दरी असल्याने एका बाजूला संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असून ती बांधण्याची सूचनाच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यापूर्वीच केली होती. तर अन्य सुरक्षेची पूर्तताही करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र निधीअभावी काम पुढे सरकत नसल्याने अखेर ६ कोटींहून अधिक निधी मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)ही कामे होणार : मंजूर झालेल्या या निधीतून १५० मीटर संरक्षक भिंत बांधली जाईल. त्याचप्रमाणे ५०० मीटरची दगडी तटबंदी बांधण्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ५ हजार ६५0 मीटरचे बॅरिअरही उभारले जातील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
माथेरानच्या राणीसाठी ६ कोटींचा निधी
By admin | Published: January 11, 2017 6:53 AM