खालापूर : मुंबईतून कार्ला येथे एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे माडप बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. याात अंधेरीच्या वर्सोवा येथील सहा जण ठार झाले असून, २० जण जखमी आहेत. कार्ला येथून दर्शन घेवून सर्व जण परत येत होते. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने लोखंडी सुरक्षा कठड्याला धडक दिल्यानंतर टेम्पो उलटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.मुंबईतील वर्सोवा येथील कोळी बांधव वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीच्या एमएच४३ यू५५८२ या क्र मांकाच्या टेम्पोतून कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी २६ जण रविवारी सकाळी गेले होते. दर्शन झाल्यानंतर रात्रीचे जेवण करून ते पुन्हा मुंबईकडे येत होते. रात्री एक्स्प्रेसवेवर वाहने कमी असल्याने टेम्पो चालकाने वेग वाढवला होता. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास माडप बोगदा पार केल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्यावर जावून धडकला. टेम्पोचा वेग इतका होता की शेजारी असलेला विजेचा खांबही धडकेने तुटून पडला होता. या अपघातात वर्सोवा येथील विशाल चमार (२६), शैला बंगाली (३२), हैसा चमार (४५), गवा वैती (४०), दत्ता वैती (३५) व धीरज पाटील (३०) हे सहा जण ठार झाले आहेत. तर टेम्पोत असलेले २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर पनवेल येथील पॅनासिया, अष्टविनायक व एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(वार्ताहर)
टेम्पो अपघातात ६ ठार
By admin | Published: November 24, 2015 2:47 AM