विवेक चांदूरकर/अकोला : पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्यांना गतवर्षी दिलेले पीककर्ज वसूल न करता या कर्जाचे पाच वर्षांकरिता पुनर्गठन करून, नवीन कर्जवाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पाच वर्षांकरिता पुनर्गठित केलेल्या कर्जावर शेतकर्यांना १२ टक्के व्याज द्यावे लागणार होते; मात्र यामध्ये बदल करून शेतकर्यांना पुनर्गठित कर्जावरील पहिल्या वर्षीचे व्याज माफ करण्यात आले आहे. पुढील चार वर्षांसाठी १२ टक्के नव्हे तर सहा टक्के व्याज शेतकर्यांना भरावे लागणार आहे. २0१४ - १५ या वर्षातील पीककर्जाचे व्याजासह पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी रूपांतरण करण्याबाबत विभागामार्फत यापूर्वीच सहकारी बँकांना व व्यापारी बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांनी जून व जुलै २0१५ मध्ये सुमारे २५00 कोटी कर्जाचे रूपांतरण केले. टंचाईग्रस्त भागातील बँकांमार्फत सुमारे ६00 कोटी अल्प मुदत कर्जाचे रूपांतरण होण्याची शक्यता आहे. या कर्जाची परतफेड सन २0१५-१६ या वर्षांपासून पाच वर्षात करावयाची आहे. त्यानुसार या कर्जाचा पहिला हप्ता जून २0१६ मध्ये देय होणार आहे. रूपांतरित कर्जावर विविध बँकांकडून सुमारे ११.५ ते १२ टक्के व्याज दर आकारण्यात येते. पीककर्जाच्या तुलनेत रूपांतरित कर्जाचा व्याजदर जास्त असल्यामुळे टंचाईग्रस्त भागातील शेतकर्यांना व्याजाचा अधिक भार सोसावा लागतो. अशा शेतकर्यांच्या रूपांतरित कर्जावरील व्याजाचा काही भार शासनामार्फत सोसण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार चार वर्षांचे सहा टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत शेतकर्यांच्यावतीने बँकांना अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
कर्ज पुनर्गठनावर शेतक-यांना सहा टक्के व्याज
By admin | Published: July 31, 2015 10:39 PM