ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होणार असून सर्व पदवी परीक्षा ६०:४० या ‘पॅटर्न’नुसार होणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला व विद्वत्ता परिषदेने याला मान्यता दिली. २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून परीक्षेची ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.
आजच्या परीक्षा प्रणालीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर प्रचंड ताण वाढला आहे. परीक्षा विभाग हा विद्यापीठाचा पाठीचा कणा असतो, परंतु तो कोलमडायला आला आहे. अशा स्थितीत विद्यापीठाला खरोखरच प्रगती करायची असेल तर नवीन परीक्षा प्रणालीची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पदग्रहण करताना बोलून दाखविला होता. त्यासंदर्भात पुढे विचार सुरू झाला व प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्वच पदवी अभ्यासक्रमांना ६०:४० परीक्षा प्रणालीचा आराखडा तयार करण्यासाठी समिती बसविण्यात आली.
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा खरा कस लागणार आहे. शिवाय विद्यापीठावरील ताणदेखील कमी होईल.याची अंमलबजावणी पुढील सत्रापासूनच करण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.
-अशी आहे ६०:४० प्रणाली
या ‘६०:४०’ प्रणालीनुसार विद्यार्थ्यांच्या २ परीक्षा होतील. यातील ४० टक्के गुणांची परीक्षा ही महाविद्यालयाकडून घेण्यात येईल व त्यात विस्तारपूर्वक उत्तरे लिहीण्याची संधी असेल. विद्यापीठाकडून ६० टक्के गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना यात केवळ अचूक उत्तरांना खूण करावी लागेल. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी प्रश्नांची ‘बँक’ तयार करण्यात येतील व विद्यार्थ्यांना विविध प्रश्नपत्रिकांचे संच देण्यात येतील. याचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होईल व ८ दिवसात निकाल जाहीर होऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या मनात शंका असेल तर त्यांना योग्य उत्तरांसोबतच ‘आॅनलाईन’ उत्तरपत्रिका पुरविण्यात येतील.