ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 17- गेल्या सहा महिन्यात कोल्हापूर जिल्हयात झालेल्या सुमारे ६० घरफोड्याचा छडा कोल्हापुरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शनिवारी लावला. उस्मानाबाद जिल्हयातील घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांचा टोळी प्रमुख संशयित विलास छना शिंदे याच्यासह सहा जण पसार आहेत. त्यांनी मुंबई, ठाणे ग्रामीण, सांगली, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक या जिल्हयात घरफोड्या केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. चड्डी बनियन गँग अशी या चोरट्यांची ओळख आहे. त्यांच्याकडून अमेरिका, सिंगापूर, भूतान, चीन आणि थायलंड या देशांचे चलन सापडले. या चलनांसह सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उस्मानाबाद जिल्हयातील संशयित दत्ता आत्माराम काळे (वय २५), रामेश्वर छना शिंदे (३९), राजेंद्र आबा काळे (२४ ) व अनिल भगवान काळे (४९, सर्व रा. इटकूर , ता.कळंब) या चौघांना अटक करण्यात आली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नोव्हेंबर २०१६ पासून ते मे २०१७ अखेर या कालावधीत कोल्हापूर जिल्हयात सुमारे ५० हून अधिक घरफोड्या झाल्या. गेल्या महिन्यात न्यु कणेरकर नगरात तब्बल ११ घरफोड्या झाल्या . या घरफोडयामुळे नागरिकांसह पोलिस हवालदिल झाले होते. याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विविध पथके स्थापन केली. त्यांनी अशा प्रकारच्या घरफोड्या कोण करतात, याची माहिती घेतली. त्यानूसार उस्मानाबाद जिल्हयातील एका विशिष्ट समाजाचे लोक असे प्रकार करतात याची माहिती गोपनीय बातमीनूसार मिळाली. त्याप्रमाणे उस्मानाबाद येथे पोलिसांच्या पथक त्याठिकाणी तळ ठोकून होते. त्यांनी इटकूर येथे एका वसाहतीवर छापा टाकून संशयित दत्ता काळे, रामेश्वर शिंदे, राजेंद्र काळे व अनिल काळे या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता ८६ हजार ४० रुपये किंमतीचे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ हजार ११० रुपये किंमतीचे २११ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १२ चलनी नोटा,त्यामध्ये या पाच देशांचे परकीय चलन, तीन मोबाईल, कॅमेरा, चाकू व एक पंच असा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी चोरी केलेले सोन्या -चांदीचे दागिने हे कळंब परिसरातील सोनारांना विकले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या चौघांनी कोल्हापूरातील कणेरनगर नगर येथील चोरीची कबुली दिली.पोलिसांनी त्यांच्याकडून कणेरनगरातील मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक अमोल माळी, राजेंद्र सानप, युवराज आठरे, सचिन पंडित, शरद माळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्यात प्रथमच चड्डी बनियन गँगवर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या गँगकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली आहे.
अशा केल्या जात होत्या चोऱ्या
उस्मानाबाद जिल्हयातील अटक केलेले हे तेथून कोल्हापूरात एस.टी.बसने पहाटे येत होते.त्यानंतर ते ऊसाच्या शेतात बसत .तेथून ते दिवसभर या टोळीतील चौघे-चौघे ग्रामीण व उपनगरात जाऊन टेहळणी करण्यासाठी जात असत. ज्या घराला कुलूप त्याठिकाणी रात्रीच्या वेळेत चोऱ्या करत असत. चोरी केल्यानंतर त्यातील चौघेजण पहाटे पुन्हा उस्मानाबादकडे रवाना होत होते. त्यानंतर चोरी करणारे पुन्हा चार दिवसानंतर ते कोल्हापूरात येत असत.
छडा कसा लागला
घरफोडीनंतर बाहेर गेल्यावर ते त्यातील काहीजण एका हॉटेल-धाब्यावर बसत. त्याठिकाणी जेवण करुन ते उस्मानाबादकडे जात. त्यांचे वागणे-बोलणे आणि सवयींची माहिती गुप्त बातमीनूसार मिळाली.त्यानूसार पोलिसांनी हॉटेल,धाबा यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते उस्मानाबाद जिल्हयातील असल्याचे समजले. त्यानूसार पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना इटकूर येथून जेरबंद केले.