ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 17 - लोणावळा शहरात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केले आहे. या चार जणांकडून तब्बल 60 लाख रुपये असलेल्या जुन्या एक हजाराच्या नोटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पुण्याहून लोणावळमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी एक कार येत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, नारायणी चौकी परिसरात त्यांना सापळा रचला. परिसरात आलेल्या मारुती कारला थांबवून त्यांनी कारमधील चौघांची चौकशी केली व कारची तपासणी केली. यावेळी पोलिसांनी कारच्या डिकीमधील लाल रंगाच्या बॅगेत 60 लाख रुपयांच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा आढळल्या. धक्कादायक बाब म्हणजे या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या कारमधील लोकांमध्ये एक पोलीस कर्मचारीदेखील होता. शाम शिंदे (वय 45), पोलीस कर्मचारी रोहिदास वाघिरे (वय 43), बालाजी चिद्रावार (वय 65)प्रशांत शेवते (वय 45)अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.
दरम्यान, मुंबईतील मुलुंड परिसरातही एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतला. या निर्णयामुळे काळा पैसाधारकांची चांगलीच झोप उडाली. दरम्यान, आजही चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा मोठ्या प्रमाणात जप्त होण्याच्या घटना उघडकीस येत आहे.