मुंबई : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत केला. सिंह यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले असून, सरकार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुचेष्टा करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी उपस्थित झालेल्या चर्चेला संसदेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री सिंह म्हणाले, की महाराष्ट्रातील केवळ तीन शेतकऱ्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. तशी माहिती आपणास राज्य सरकारकडून प्राप्त झाली आहे. राधामोहन यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. सरकारविरुद्ध आम्ही प्रत्येक जिल्ह्णात आंदोलन करणार आहोत, असेही खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्याचे कृषि व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या विधानामुळे विनाकारण गहजब केला गेला. अवकाळी पाऊस व गारपीट या काळात आत्महत्या करणाऱ्या ६०१ शेतकऱ्यांपैकी १४१ शेतकऱ्यांचे कुटुंबिय सरकारी मदतीस पात्र ठरले. १११ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस अपात्र ठरले. २५९ शेतकरी आत्महत्या प्रकरणात तपास सुरू आहे. या शेतकऱ्यांनी कोणत्या कारणास्तव मृत्यूला कवटाळले ते शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गारपिटीत ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या!
By admin | Published: April 21, 2015 6:34 AM