खामगाव (जि. बुलडाणा) : एका चारी वाहनातून नेण्यात येणारी ६१ लाखाची रोख रक्कम पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी पहाटे जप्त केली. यासंदर्भात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने खळबळ उडाली आहे . खामगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर आपल्या सहकार्यांसह २५ ऑगस्ट रोजी लाखनवाडा येथून पहाटे ५ वाजताच्या सुमारास खामगावकडे परतत होत्या. यावेळी त्यांच्या वाहनाला भरधाव जाणार्या सिल्व्हर रंगाच्या स्कॉर्पिओने (एम.एच.१९ बीजे ६३४२) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या वाहनाचा संशय आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी दरेकर यांनी वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, स्कॉर्पिओ चालक न थांबता निघून गेला. पोलिसांनी पाठलाग करुन शेवटी खामगाव शहरानजीक हे ेवाहन पकडले. दरम्यान, शहर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता सीटमध्ये तयार केलेल्या एका कप्प्यात तब्बल ६१ लाखाची रोकड आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष सदर रक्कम ताब्यात घेवून भारतीय स्टेट बँक खामगाव येथे मोजणी व पडताळणी केली. या रक्कमेबाबत चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका जणाची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांकडून अद्यापही चौकशी सुरु आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही पूर्व मुंबईच्या भोलेश्वर येथील रहिवासी आहेत. सदर रक्कम चोरीची असावी, यादृष्टीने पोलिस चौकशी करीत आहेत. एटीएमसारख्या सुविधा असताना सदर मोठी रक्कम कोठून आणली आणि कोठे घेवून जात आहेत याबाबत काही एक सांगत नसल्याने दोघांविरुध्द शहर पोलिस स्टेशनला कलम ४१ (१) (ड) जाफौनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बाविस्कर व अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी.डी.ढाकणे हे करीत आहेत.
*सीटमध्ये कप्पा !
स्कॉर्पिओच्या सीटमध्ये एक कप्पा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये ६१ लाखाची ही रक्कम लपविण्यात आली होती. हजार व पाचशेच्या नोटांची बंडले या कप्प्यामध्ये होती. या वाहनातून नेहमीच नोटांची वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.