मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत एकूण ६१,०५० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत आढळल्या तर ११,५३७ व्यक्तींचा अद्याप पत्ता लागलेला नाही, अशी माहितीमाहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केलेल्या अर्जांवर गुन्हे शाखेच्या हरवलेल्या व्यक्तींसंबंधीच्या केंद्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार वर्ष २०१० पासून ते मार्च २०१५ पर्यंत मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत व्यक्ती हरविल्याच्या एकूण ६१,०५० तक्रारींची नोंद झाली. या बेपत्ता व्यक्तींमध्ये २९,६६९ पुरुष व ३१,३९१ महिलांचा समावेश होता.या बेपत्ता व्यक्तींची वर्षनिहाय आकडेवारी अशी : वर्ष २०१०- ४,४५५६ पुरुष व ४,९४९ महिला. वर्ष २०११-४,५८१ पुरुष व ५,३०२ महिला. वर्ष २०१२- ७,३३६ पुरुष व ८,४१९ महिला. वर्ष २०१३- ५,९९३ पुरुष व ६,५६४ महिला. वर्ष २०१४-५,९४६ पुरुष व ४,९७० महिला. मार्च २०१५ पर्यंत १,२५७ पुरुष व १,१८७ महिला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या या व्यक्तींपैकी ४६६ व्यक्ती नंतर मृतावस्थेत सापडल्या. त्यात ३०६ पुरुष व १५० महिलांचा समावेश होता. मृतावस्थेत आढळलेल्यांमध्ये १० वर्षापर्यंतच्या वयाची १६ लहान मुले होती. त्यात १० मुलगे व सहा मुली होत्या. कोठारी यांना दिल्या गेलेल्या माहितीनुसार या बेपत्ता व्यक्तींपैकी ४३,८९४ व्यक्तींचा कालांतराने शोध लागला असून ११, ५३७ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. अद्याप शोध न लागलेल्यांमध्ये १० वर्षांखालील वयाच्या २८३ मुलांचा समावेश आहे. १,१२५ व्यक्ती वर्ष २०१० पासून, १,४३२ व्यक्ती वर्ष २०११ पासून, २,९८७ व्यक्ती वर्ष २०१२ पासून, ४,२९८ व्यक्ती वर्ष २०१३ पासून तर १,२४३ व्यक्ती वर्ष २०१४ पासून बेपत्ता आहेत. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील ६१ हजार व्यक्ती बेपत्ता !
By admin | Published: April 23, 2015 5:37 AM