मुंबई : स्वाइन फ्लूचे मंगळवारी एकाच दिवसात ६३ नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतल्या रुग्णांची संख्या ३१० वर पोहोचली आहे. पनवेलमधील एका ५८ वर्षीय महिलेचा बॉम्बे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १३ झाली आहे. दिवसात सरासरी २० ते २२ रुग्ण आढळत होते. सोमवारी आकडा रोडावला होता. सोमवारी फक्त सात रुग्ण आढळले होते. पण मंगळवारी ६३ रुग्ण आढळले. ४५ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. तर १८ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. पनवेलमधील एका महिलेला १४ फेब्रुवारीला बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते. तिला उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा विकार होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मुंबई बाहेरून ३ नवे रुग्ण उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. तिघांना ही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली. मुंबई बाहेरून आतापर्यंत एकूण ७७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईत स्वाइन फ्लूचे ६३ नवे रुग्ण
By admin | Published: February 25, 2015 2:26 AM