औरंगाबाद : उन्हाचा जोरदार चटका, दगडफेकीच्या घटना आणि पैशाचे खुलेआम वाटप, अशा वातावरणात महापालिका निवडणुकीसाठी औरंगाबादकरांनी बुधवारी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान पाच ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या, तर एका ठिकाणी जोरदार राडा झाला. दोन उमेदवारांच्या घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. २०१० च्या निवडणुकीत केवळ ५८ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी मतमोजणी होईल. महापालिकेच्या सहाव्या निवडणुकीसाठी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ११३ पैकी १११ वॉर्डामध्ये मतदान पार पडले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत शहरात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र, दुपारी व त्यानंतर काही वॉर्डांमध्ये गडबडी सुरू झाल्या. मुस्लिमबहुल गणेश कॉलनी भागात दुपारी तीन वाजेच्या सुमारास एमआयएम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. या हाणामारीत तीन जण जखमी झाले. शिवसेनेचे उमेदवार राधाकृष्ण गायकवाड तसेच नागेश्वरवाडीतील अपक्ष उमेदवार कीर्ती शिंदे यांच्या घरावर दगडफेक झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत सुमारे २० टक्केमतदान झाले. दुपारी भर उन्हात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा कायम होत्या. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे ४० टक्के मतदान झाले. १०५ हून अधिक वॉर्डांत शांततेत मतदान पार पडले.
औरंगाबादेत ६३ टक्के मतदान; आज फैसला
By admin | Published: April 23, 2015 5:07 AM