अकोला : उन्हासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचेही चटके जाणवत आहेत. खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सुकळी तलावातून तब्बल २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. अकोला शहर आणि खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील या गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने, पाणीपुरवठ्यात अनेक अडचणी येत आहेत.झऱ्याच्या पाण्यावर भागविली जाते तहान! खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या आपातापा, आपोती, आखतवाडा व इतर गावांजवळून जाणाऱ्या लोणार नाल्यात ठिकठिकाणी असलेल्या झऱ्याच्या पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवत आहेत. काही ठिकाणी हातपंपांच्या पाण्याचा वापर ग्रामस्थांना करावा लागत आहे.जनावरांना जगवावं कसं? अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे. माणसांचीच जिथं सोय नाही, तिथं जनावरांना जगविण्यासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न जिल्ह्यातील पशुधन पालक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जिवापाड जपलेली ही जनावरं पशुपालक नाईलाजास्तव विकताना दिसत आहेत. दुर्दैव म्हणजे, ढोर बाजारात या जनावरांचेही भाव कमालीचे घसरले आहेत. ...पण कामे रेंगाळली!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात अकोला, आकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील ५९९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ हजारावर उपाययोजना मंजूर करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात १८ एप्रिलपर्यंत केवळ १८ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली असून, १२ कामे सुरू आहेत. उर्वरित ९७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.
६४ गावांना मिळते २५ दिवसांआड पाणी!
By admin | Published: April 24, 2016 2:53 AM