नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे, याबाबत कॅगने सुद्धा ताशेरे ओढले आहेत, असे सांगत या प्रकरणाची दखल घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मीडियासोबत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, "देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटींचा गोंधळ असून आर्थिक घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. आमचे सरकार चौकशी सरकार नाही, पण जे रेकॉर्डला आहे, त्याची आम्ही दखल घेणार आहेत. तसेच, कॅगच्या मुद्द्यांची नोंद घ्यावी लागणार आहे.”
याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजेच अजित पवार निर्दोष आहेत. हे त्यांना माहीत होते असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच, भाजपाने अजित पवार यांच्यावर 5 वर्षे खोटे आरोप केले आणि ते एसीबीने सुद्धा सिद्ध केले, असेही म्हणत जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.
याशिवाय, विदर्भातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत आज चर्चा होईल, असेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आजचा हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.