पुणे : शहरात मागील अनेक दिवसांपासून कीटकजन्य आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. आॅक्टोबर महिना आला असून, अद्यापही या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आॅक्टोबरच्या केवळ ४ दिवसांत डेंगीचे ६६ आणि चिकुनगुनियाचे ७१ रुग्ण आढळून आले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. पालिकेकडून या साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जात असतानाही ही साथ आटोक्यात येत नसल्याने पालिकेच्या आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात डेंगीचे १ हजार १०३ रुग्ण सापडले असून, चिकुनगुनियाचे ४९० रुग्ण सापडले होते. त्यामुळे या दोन्ही आजारांचे मिळून एका महिन्यात एकूण १५९३ रुग्ण आढळले होते. त्यामुळे या वर्षातील एका महिन्यात सापडलेल्या रुग्णांची सर्वोच्च संख्या आहे. १ जानेवारी २०१६ पासून मंगळवारपर्यंत डेंगीचे २४९२ इतके रुग्ण आढळून आले असून, चिकुनगुनियाचे ९५५ रुग्ण सापडले आहेत. जुलैपासून शहराला या दोन आजारांनी वेढा घातला असून, सर्वांत जास्त केसेस वारजे, हडपसर आणि कोथरूड, टिळक रोड, कर्वेनगर आणि औंध येथे नोंद झाल्या आहेत. या आजारांची लागण एडिस इजिप्ती या डासापासून होत असून, हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे नागरिकांनी फ्रिजचे कप्पे कोरडे करावेत, प्लॅस्टिक पिशव्या होल पडून कचऱ्यात टाकाव्या, पाणी साठवण्याची भांडी व्यवस्थित झाकून ठेवावी. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा सर्व भांडी स्वच्छ करावीत. फुलदाण्या आठवड्यातून एकदा रिकाम्या करून स्वच्छ कराव्यात. तसेच, ज्यामध्ये पाणी साठत असेल ते प्लॅस्टिक साहित्यही नष्ट करावे, अशा स्वरूपाचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याच आवाहन वारंवार करण्यात येत आहे; तसेच यासाठी दंडही आकारण्यात येत आहे; मात्र अद्यापही नागरीक स्वच्छता आणि पाणी साठू न देणे याबाबत तितके गंभीर नाहीत.डेंगीची चाचणी केवळ ६०० रुपयांतपुणे : शहरात वाढत असलेल्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या साथीमुळे एकीकडे नागरिक आजाराने ग्रासलेले असताना दुसरीकडे मात्र त्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने अध्यादेश काढला असून, डेंगीच्या तपासणीचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क ६०० रुपये इतके असून, तपासणी करणाऱ्या सर्व प्रयोगशाळांसाठी हे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी डेंगीसाठी असणाऱ्या एनएस१ एलिझा आणि मॅक एलिझा या तपासणीसाठी प्रत्येकी ६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारणी करण्यात येऊ नये असे शासनाने काढलेल्या अध्यादेशात सांगण्यात आले आहे.
४ दिवसांत डेंगीचे ६६, तर चिकुनगुनियाचे ७१ रुग्ण
By admin | Published: October 05, 2016 2:00 AM