विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के (७८७ मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा शिल्लक होता.राज्यात १ जून ते ११ सप्टेंबरअखेर ७८७ मि.मी. पावसाची नोंद झालीे. हा पाऊस सरासरीच्या ७७.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या ८५.४ टक्के एवढा झाला होता. सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद या सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, लातूर, बुलढाणा, नागपूर या बारा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला. जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पाऊस; यवतमाळ जिल्ह्यात २६ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात ६६.८८ आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ६८.२३ टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवषीर्चा साठा पुढीलप्रमाणे- मराठवाडा-५०.०५ टक्के (३५.५७), कोकण-९४.३२ टक्के (९२.१२), नागपूर-३५.१५ टक्के (५८.४४), अमरावती-२६.७७ टक्के (६५.८२), नाशिक-७४.९८ टक्के (७१.५८) आणि पुणे-८६.१०टक्के (८०.६५).राज्यात ३०२ टँकर्स सुरूराज्यातील ३१२गावे आणि १५०४ वाड्यंना आजअखेर ३०२ टँकर्समार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत १४४ गावे आणि ६८० वाड्यांसाठी २०४ टँकर्स सुरू होते. टिंचाईग्रस्त गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा, विदर्भात परिस्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 4:40 AM