भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला खर्च निर्धारित वेळेत न दिलेल्या जिल्ह्यातील१०६ ग्रामपंचायतींमधील ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातील निवडून आलेल्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, तर उर्वरित उमेदवार पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्र होऊ शकतात. सध्या महसूल प्रशासनातर्फे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी देतील. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींसाठी दि. २७ जुलै २०१५ ला मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. खर्च न दिल्यास निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द होते. पराभूत उमेदवारास पुन्हा पाच वर्षांमध्ये निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांने खर्चाचा तपशील देण्यासंबंधी प्रशासनाने प्रभावी जागृती केली. प्रत्येक उमेदवारापर्यंत ही माहिती पोहोचविण्याकडे लक्ष वेधले. वेळेत खर्च न दिलेल्या उमेदवारांना नोटीस दिली तरीही खर्च देण्याकडे ६७४ उमेदवारांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, जिल्हा प्रशासन खर्च न दिलेल्या उमेदवारांची यादी तयार करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. चंदगड, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, आजरा, शिरोळ, गगनबावडा या तालुक्यांतील सर्व उमेदवारांनी खर्च दिले आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले, भुदरगड या तालुक्यांतील खर्च न दिलेल्या ग्रामपंचायतींमधील सदस्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. कागल तालुक्यातील सदस्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी काढतील. खर्च न दिलेल्यात पराभूत उमेदवारांची संख्या अधिक आहेत. यावरून निवडणूक लढवायची मात्र पराभूत झाल्यानंतर खर्च द्यायचा नाही अशीच मानसिकता अधिक असल्याचे स्पष्ट होते. विजयी उमेदवारांपैकी करवीर तालुक्यातील तिघांनी खर्च दिलेला नाही. सर्वाधिक करवीर तालुक्यात...ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च न दिलेल्या उमेदवारांची व कंसात ग्रामपंचायतींची संख्या अशी : शाहूवाडी (१७) ९८, पन्हाळा (२६) ७७, करवीर (३६) ३८१, हातकणंगले (१) १, भुदरगड (७) १३, कागल (१९) १०४.सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक लढविलेले आणि खर्च न दिलेल्या उमेदवारांची सुनावणी घेतली जात आहे. कागल वगळता उर्वरित तालुक्यांतील सुनावणी पूर्ण झाली आहे. आयोगाच्या नियमाप्रमाणे खर्च न दिलेल्या उमेदवारांवर कारवाई होईल. - किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)
तब्बल ६७४ उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार
By admin | Published: January 09, 2016 12:16 AM